भंडारा,
leopard rescue भंडारा वनविभागांतर्गत येणाऱ्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील केसलावाडा (मौजा खापरी) येथे 1 मे रोजी सकाळी एका मादी बिबट्यासह तिच्या दोन बछड्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. वनविभागाच्या तत्परतेमुळे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संभाव्य संघर्ष टाळण्यात यश आले.
1 रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास केसलावाडा येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या नाल्यात एक मादी बिबट आणि तिची दोन बछडे (एक नर व एक मादी) असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली. परिसरात लोकांची गर्दी वाढून वन्यप्राण्यांना इजा होऊ नये यासाठी अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांनी तातडीने पथकासह घटनास्थळ गाठले व कारवाई सुरु केली.
काही दिवसांपासून मौजा खापरी परिसरात पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत होत्या. बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.leopard rescue संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाने आधीच परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची तयारी केली होती. याच पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
त्यानंतर मादी बिबट्या आणि दोन्ही बछड्यांची वैद्यकीय तपासणी करून सर्व वन्यप्राणी पूर्णपणे फिट आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणित केल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
हे बचाव कार्य भंडारा उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा, जीवशास्त्रज्ञ शुभम मोडकर, वनपाल आर.आर. दुनेदार, क्षेत्र सहाय्यक दिपक रंगारी, वनरक्षक निलेश श्रीरामे, संदीप भुसारी, आर.बी. घोनमोडे आणि RRT टीमच्या सदस्यांनी मोलाची कामगिरी केली.