वाशीम,
dattatreya bharane जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने, समन्वयाने आणि ठोस कृतीतून प्रयत्न करण्याची गरज आहे. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत संतुलित प्रगती साधत, स्थानिकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. महिला सक्षमीकरण, युवकांचे कौशल्य विकास, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देत आपण पुढे गेलो, तर वाशीम जिल्हा केवळ प्रगतच नव्हे तर समृद्ध आणि आदर्श जिल्हा म्हणून राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करेल असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय समारंभात राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.यावेळी शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री ना.भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,अपर पोलिस अधीक्षक लता फड,उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे पुढे बोलतांना म्हणाले की, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख हेटर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये ३ लाख हेटरवर सोयाबीन तर ६५ हजार हेटरवर तुर पिक प्रस्तावित आहे. शेतकर्यांकडे दीड लाख क्विंटल घरचे बियाणे उपलब्ध असून, खतांचे ७८ हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने राज्यात सातत्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. कॅथलॅब लवकरच सुरू होणार असून ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट उभारले जात आहे. ग्रामीण रुग्णालय मालेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी तसेच कवठळ व लोणी अरब या उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणन मिळाले आहे. येत्या वर्षात ५० टक्के आरोग्य संस्था प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागाच्या योजनांमध्ये जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. लेक लाडकी योजनेत ७ हजार महिलांना ३५७ लाख रुपये वितरित झाले असून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत ५ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रात १६ शाळांचा पी.एम. श्री योजनेत समावेश झाला आहे. महिला सक्षमीकरणासाठी ३ हजार बचत गटांच्या माध्यमातून ३३ हजार महिलांना आर्थिक प्रवाहात आणण्यात आले आहे.
ऊर्जा क्षेत्रात महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत ५ हजार तसेच ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेतून ५ हजार सौर पंप कार्यान्वित झाले आहेत. बळीराजा मोफत वीज योजनेतून ६६ हजार शेतकर्यांना लाभ झाला आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मार्चअखेर सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री भरणे यांनी पोलिस पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यानंतर स्वातंत्र्य सैनिक आणि उपस्थित नागरिकांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.dattatreya bharane यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी,खेळाडू, संस्था आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व नायब तहसीलदार अर्चना घोळवे यांनी केले. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी वर्ग, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.