कारवाईची मागणी
श्रीक्षेत्र माहूर,
Mahur: Safety of students कुंभकोणम दुर्घटनेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी 5 ऑक्टोबर 2009 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात दिलेल्या 20 निर्देशांची माहूर शहरासह तालुक्यातील अनेक इंग्रजी शाळांकडून अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक विनायक संतान व शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी यांनी 30 एप्रिल रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदनातून केला आहे.
Mahur: Safety of students शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना नसल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख संतान व सूर्यवंशी यांनी आपल्या निवेदनात केला आहे. या शाळांकडे इमारत बांधकामासाठी आवश्यक ‘नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया’चे निकष पूर्ण नाहीत. अग्निशमन यंत्रणा, पाण्याचा साठा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. तसेच शाळांमध्ये खेळाच्या सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा यांचाही अभाव असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. याशिवाय, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा अधिकार असतानाही संबंधित शाळांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप त्यातून करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित शाळांवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.