मुंबई
marathi natak ae bhau doka nako khau काही नाटक ही केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर ती आयुष्याच्या एका कालखंडाची आणि जुन्या ऋणानुबंधांची साक्ष असतात. तब्बल २० वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ हे नाटक पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण यंदा या नाटकाच्या पडद्यामागे केवळ तांत्रिक तयारी नाही, तर भावनांची एक मोठी गुंफण आहे. रॉयल थिएटर आणि निर्माते मिहिर गवळी यांच्या या नव्या प्रयोगाचे दिग्दर्शक संतोष पवार यांनी या प्रवासातील काही अत्यंत हळवे पैलू उलगडले आहेत.
‘बिटवीन द लाईन्स’ दडलेली संहितेची जादू
नाटकाच्या संहितेबद्दल बोलताना संतोष पवार एका वेगळ्याच सत्याचा उलगडा करतात. “गंमत म्हणजे, २० वर्षांपूर्वी जेव्हा हे नाटक पहिल्यांदा माझ्यासमोर वाचलं गेलं होतं, तेव्हा ते मला फारसं आवडलं नव्हतं. पण एक वर्षानंतर जेव्हा तीच संहिता पुन्हा माझ्या हातात आली, तेव्हा मी विनंती केली की मला वाचायला द्या. आणि जेव्हा मी स्वतः वाचल तेव्हा कळलं हे एक परिपूर्ण नाटक आहे. दिग्दर्शकाला वाव देणाऱ्या दोन लाईन्स मधल्या जागा आहेत. एकाहून एक कॅरेक्टर्स, धमाल प्रसंग, आणि खरच डोक्याला गुदगुल्या करणारी कथा आहे. प्रेक्षकांना एका नाटकातून जे जे हवं असतं ते ते सर्व या नाटकात आहे, हे जाणवलं. त्याप्रमाणे नाटक केलं आणि नाटकाने इतिहास घडवला. आणि आज २० वर्षांनंतर नव्या संचात, पुन्हा हे नाटक नव्याने करताना एक वेगळंच समाधान मिळत आहे.”
प्रेक्षकांचा विश्वास: एक प्रामाणिक प्रवास
दिग्दर्शक म्हणून marathi natak ae bhau doka nako khau संतोष पवार नेहमीच आपल्या मतांशी ठाम राहिले आहेत, त्यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली, पण रंगभूमीवरचा त्यांचा प्रामाणिकपणा कधी ढळला नाही. “मी कधीही केवळ ‘करायचं’ म्हणून नाटक करत नाही. रसिक मायबाप प्रेक्षक जेव्हा तिकीट काढून येतात, तेव्हा त्यांचा माझ्यावर एक विश्वास असतो. तो विश्वास जपण्यासाठी मी प्रत्येक प्रयोगात माझं १०० टक्के देतो. आज मी जे काम करतोय, त्यावरच माझ्या पुढच्या नाटकाचं भविष्य अवलंबून असतं, याची मला जाणीव आहे. हे नाटक म्हणजे केवळ विनोद नाही, तर आमच्या मैत्रीची आणि रंगभूमीवरील निष्ठेची ही एक छोटीशी भेट आहे.”विनय येडेकर यांच्या सोबत संतोष पवार यांची अभिनयाची खडक धमाल खडाजंगी रंगणार आहे. त्यात आनंदा कारेकर, सानिका शिंदे, सोनाली मगर, आदित्य गटे आणि संकेत बिवलकर हे कलाकार आपल्या अभिनयाने रंग भरणार आहेत. संदेश बेंद्रे (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाश योजना), आशुतोष वाघमारे (संगीत) आणि हास्या पवार (वेशभूषा) यांनी हे नाटक नव्या ढंगात सजवले आहे.शुभारंभाचे प्रयोग 1 मे 2026 (शुक्रवार) रोजी रात्री 8.30 वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे होणार आहे तर 2 मे 2026 (शनिवार) रोजी दुपारी 4.00 वाजता मीनाताई ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे होणार आहे.