चौघांच्या मृत्यू कलिंगडामुळे झाला नाही

    दिनांक :02-May-2026
Total Views |
मुंबई
watermelon poisoning  मुंबईत एका कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनंतर कलिंगडामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना, राज्य अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्राथमिक तपासात कलिंगड किंवा इतर अन्नपदार्थांमध्ये कोणतीही भेसळ आढळली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निष्कर्षामुळे या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्टच आहे.
 

watermelon poisoning  
एफडीएने कुटुंबाच्या घरातून जप्त केलेल्या कलिंगडासह विविध अन्ननमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यामध्ये बिर्याणी, पाणी, मसाले तसेच इतर खाद्यपदार्थांचा समावेश होता. प्राथमिक अहवालानुसार कोणत्याही नमुन्यात कृत्रिम रंगद्रव्य, रासायनिक पदार्थ किंवा गोडवा वाढवणारे घटक आढळले नाहीत. त्यामुळे कलिंगडातून झालेल्या भेसळीचा किंवा अन्नामध्ये जाणूनबुजून घातलेल्या रसायनांचा अंदाज सध्या तरी फेटाळला गेला आहे.
तथापि, तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की एफडीएचा तपास हा केवळ अन्नातील भेसळ शोधण्यापुरता मर्यादित असतो. जीवाणूजन्य संसर्ग, विषबाधा किंवा इतर जैविक कारणे यांचा तपास फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेकडून केला जातो. त्यामुळे या प्रकरणात बॅक्टेरियल संसर्ग किंवा कोणत्यातरी अज्ञात विषारी घटकामुळे मृत्यू झाला असण्याची शक्यता अद्याप पूर्णपणे नाकारता येत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.या घटनेत एका कुटुंबातील चौघांचा अल्प कालावधीत मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एफडीएच्या अहवालानंतर तपासाचा कल आता विषारी पदार्थ, जैविक संसर्ग किंवा इतर संभाव्य कारणांकडे वळला आहे.
दरम्यान, पोलिस आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अंतिम कारण स्पष्ट होण्यासाठी फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या अहवालानंतरच या रहस्यमय मृत्यूमागील खरी कारणे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.