‘नमन तुला सह्याद्रीचा राजा’मागे आमगावचा जेरी पुंडकर

    दिनांक :02-May-2026
Total Views |
- छायांकनातून दिला कॅमेर्‍याचा जादुई स्पर्श

आमगाव,
'Naman Tula Sahyadricha Raja' महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नमन तुला सह्याद्रीचा राजा या गाण्याने सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या गाण्याच्या भव्यतेमागे आणि प्रत्येक फ्रेममागे आमगावच्या जेरी पुंडकर यांचा कॅमेर्‍याचा जादुई स्पर्श दडलेला आहे. जिद्द असेल तर आभाळही ठेंगणे होते, या उक्तीला साजेसं उदाहरण जेरीने दिला असून जिल्ह्यात त्याचा सर्वत्र कौतूक होत आहे.
 
 
jery
 
'Naman Tula Sahyadricha Raja'  आमगाव येथील जयश्री संतोष पुंडकर यांचे सुपुत्र जेरी यांना फोटोग्राफीचा वारसा घरातूनच लाभला; मात्र स्वप्नांची व्याप्ती मात्र आभाळाएवढी होती. लहानपणापासूनच कॅमेर्‍यातून जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगळी होती. १२ वी शिक्षण पूर्ण होताच, मोठी स्वप्ने डोळ्यांत साठवून त्यांनी मायानगरी मुंबईची वाट धरली. मुंबईतील सुरुवातीचे दिवस संघर्षमय होते. छोट्या-छोट्या प्रोजेक्ट्सपासून सुरुवात करत, रात्रंदिवस मेहनतीतच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. झी टीव्ही आणि स्टार प्लससारख्या नामांकित वाहिन्यांसोबत काम करताना त्यांनी आपल्या कलेची ताकद सिद्ध केली. याचेच फळ म्हणून आज त्यांना अमृता फडणवीस यांच्या गाण्याचे छायांकन करण्याची संधी मिळाली. गाण्यात सह्याद्रीच्या दर्याखोर्‍यांची भव्यता, भक्तीची ओल आणि निसर्गाची दिव्यता ज्या प्रभावी पद्धतीने टिपली गेली आहे, त्याचे संपूर्ण श्रेय जेरी पुंडकर यांच्या कॅमेरावर्कला जाते. प्रत्येक अँगल कलेचा पुरावा, प्रत्येक फ्रेम भावनांनी ओथंबलेली प्रत्येक दृश्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे हे गाणं केवळ संगीतप्रेमींनाच नव्हे, तर दृश्य कलेची जाण असणार्‍या प्रत्येक रसिकालाही मंत्रमुग्ध करत आहे. एका छोट्या गावातून बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची छाप पाडणारा जेरी पुंडकर हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. त्यांच्या या यशामुळे आमगावचा आणखी एक हिरा आता चंदेरी दुनियेत झळकू लागला आहे. त्यांच्या कष्टांचे आज सोनं झालं असून, त्यांच्या यशाने संपूर्ण तालुकाच नव्हे तर जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.