‘महिलांचा आवाज बुलंद करायचा आहे...’

    दिनांक :02-May-2026
Total Views |
- कला शाखेतून प्रथम आलेल्या नंदिनीची जिद्द
- राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून समाजसेवेचा ध्यास

नागपूर, 
आज आपण जे काही आहाेत ते आपल्याला राष्ट्राने दिले आहे. त्यामुळे राष्ट्र सर्वाेेपरी असलेच पाहिजे. आणि या राष्ट्रात कायम स्त्री ची शक्ती म्हणून पूजा केली जात असतानाच तिच्यावर अत्याचाराच्या घटना ऐकून मन सुन्न हाेतं. त्यामुळे सामाजिक कार्य करतानाच मला प्रशासकीय सेवेत जाऊन महिलांचा आवाज बुलंद करायचा आहे, अशी भावना बारावी कला शाखेतून प्रथम आलेली गांधीसागर येथील आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी Nandini Khapgadia नंदिनी खापगडिया हिने व्यक्त केली.
 
 
nandini
 
राष्ट्र सेविका समितीची सेविका असलेली Nandini Khapgadia  नंदिनी ही मुळातच हुशार आणि हिमतीची. ती सांगते, बालपणापासूनच समितीच्या शाखेत जात असल्याने समाजासाठी भरीव काहीतरी करण्याचा ध्यास मी घेतला आहे. त्यामुळेच दहावीत चांगले गुण मिळूनही मी कला शाखेत प्रवेश घेतला. सामाजिक कार्यात स्वतःला झाेकून देतानाच मला प्रशासकीय सेवेत जायचे असल्याचे नंदिनी सांगते. अगदी साधे राहणीमान असलेली नंदिनी ही कळमन्यापासून दरराेज पब्लिक ट्रान्सपाेर्टने प्रवास करते. या प्रवासात अनेक अनुभव येतात. सामाजातील विसंगती, गरीबी नजरेस पडते. आणि राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून ही विसंगती दूर करण्यासाठी आपण काय करू शकताे याची समज माझ्यात विकसित हाेत गेल्याचे ती सांगते.
अन्यायाला धीराने ताेंड द्या
नंदिनी सांगते, समाजात वावरताना अनेकदा चुकीच्या प्रसंगांना सामाेरे जावे लागते. प्रवासात तर याचे नेहमीच अनुभव येतात. पण त्यांना न घाबरता महिलांनीच एकमेकींना मदत करून या प्रसंगाला ताेंड देता येते. ही निडरता येण्यासाठी प्रत्येकीने चांगले शिकले पाहिजे. त्यामुळे स्त्री शिक्षणासाठीही आम्ही समितीच्या माध्यमातून काम करीत असल्याचेही ती म्हणाली.