परीक्षा प्रणाली अद्ययावत करण्याचा प्रयत्न
चंद्रपूर,
गोंडवाना विद्यापीठ येथे परीक्षा प्रणाली अधिक सक्षम व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ‘On-screen valuation’ ‘ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते झाले. विद्यापीठातील परीक्षा प्रणाली बाबत गत काही काळापासून आक्षेप नोंदवले जात होते. त्या पृष्ठभूमीवर परीक्षा केंद्र अद्ययावत होणे ही महत्त्वाची घडामोड आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, परीक्षा संचालक डॉ. धनराज पाटील, डॉ. उत्तरवार, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते, सिनेट सदस्य उत्तमचंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘On-screen valuation’ ‘ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन’ प्रणालीमुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि अचूक होणार आहे. मानवी त्रुटी कमी होऊन मूल्यमापनाची विश्वासार्हता वाढेल. याशिवाय, ही प्रणाली वेगवान व कार्यक्षम असून, निकाल वेळेत जाहीर करण्यास मदत करेल, ज्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे माहितीची सुरक्षितता अधिक वाढेल. मूल्यमापनात एकसमानता राखली जाईल आणि कागदाच्या वापरात घट झाल्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांनाही चालना मिळेल, अशी आशा केली जात आहे. उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नंदकिशोर मेश्राम हे या केंद्राचे मुख्य मूल्यांकन अधिकारी असून, डॉ. कृष्णा कारू हे सह मूल्यांकन अधिकारी म्हणून कार्यभार पाहत आहेत.
परीक्षा प्रणालीची विश्वासार्हता बळकट होईल : डॉ. बोकारे
‘ऑन-स्क्रीन व्हॅल्युएशन सेंटर’ची स्थापना ही उच्च शिक्षणातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता अधिक बळकट होईल, असे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले.