नागपूर,
Nagpur railway station नागपूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांमुळे प्रवाशांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर काम सुरू असल्याने सध्या प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असली, तरी प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी कमी झालेल्या नाहीत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांना घ्यायला येणाऱ्या नातेवाईकांना उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी पुरेशी सोय नाही. बेंच किंवा खुर्च्यांचा अभाव असून पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्लॅटफॉर्मवर प्रवेश नसल्यामुळे विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींना अधिकच अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींना थकव्यामुळे खाली बसावे लागत असल्याचेही चित्र दिसत आहे. Nagpur railway station उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत या गैरसोयी अधिकच प्रकर्षाने जाणवत आहेत. विकासकामे आवश्यक असली तरी नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्यांची दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सौजन्य: राजेंद्र वाडी, संपर्क मित्र