भोर येथील निर्घृण कृत्याने महाराष्ट्र पेटला

    दिनांक :02-May-2026
Total Views |
पुणे
Pune Bhor rape पुणे जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. भोर तालुक्यात एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिला संपवलं आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळलली आहे. आरोपीने दगडाने चिमुरडीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवला आहे.
 

Pune Bhor rape murder case, 
या घटनेने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काल ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. तर आज गावकऱ्यांना मोर्चा काढला आहे. या मोर्चाचे रुपांतर आंदोलनात झाले असून आरोपीला ताब्यात द्या, त्याला फाशी द्या या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. पोलीस आंदोलकांची समजूत काढत आहे. या घटनेने गावात तणाव वाढला आहे. गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली आहे.
चिमुकली न दिसल्यानं शोधाशोध सुरु केल्यानंतर गोठ्यात मृतदेह आढळला
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेतील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने अत्याचार करुन दगडाने चिमुकलीची हत्या केल्याची माहितीसमोर येत आहे. आरोपी 65 वर्षीय असल्याचे देखील माहिती मिळाली आहे. दरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करून, दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला होता. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती.
अंधारे आक्रमक
दरम्यान, या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चार वर्षाच्या मुलीला अत्याचार करून ठेचून मारलं जातं, यावर गृहमंत्र्यांचा राजीनामा अजिबात आपण मागू नये अशी खोचक टीका अंधारे यांनी केली आहे. कारण सर्वसामान्य माणूस जगला काय मेला काय याच्याशी त्यांना काय देणं घेणं नाही. ते तर मी कसा सुपरमॅन, मी कसा इन्फ्रा मॅन, मी कसा शक्तिशाली, मी कसा चाणक्य हेच सांगण्यात व्यस्त आहेत.आपण फक्त एवढेच लक्षात ठेवूया की आपण एका अत्यंत असुरक्षित राज्यांमध्ये राहत आहोत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
 
 
कृती आवश्यक
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत, पीडितेला न्याय मिळेपर्यंत सरकारने तातडीने आणि निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी केली आहे. अशा घटनांमध्ये केवळ घोषणा नव्हे तर ठोस कृती आवश्यक असून, दोषींना कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, अशा क्रूर गुन्ह्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी असणे अत्यावश्यक आहे.पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी आज घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेच्या निषेधार्थ आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे लागू करण्याच्या मागणीसाठी त्यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली.रोहित पवार यांनी यावेळी बोलताना राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. “महाराष्ट्रात दररोज सरासरी २४ अत्याचारांच्या घटना घडत आहेत, म्हणजेच तासाला एक अत्याचार होतो,” अशी धक्कादायक आकडेवारी त्यांनी मांडली
 
 
हाय कोर्टाला विनंती करू
 
 
या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.या घटनेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक घटना आहे. आरोपीला अटक झाली आहे. आरोपीचे अशाप्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेतून समाजातून मोठा रोष आहे. सर्वांना या घटनेमुळे पीडित मुलीच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटतेय. आरोपीला अटक केली आहे, मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण नेऊ. स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हाय कोर्टाला विनंती करू, विशेष सरकारी वकील देऊन आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करणार आहोत.