पुणे
Devendra Fadnavis भोर तालुक्यातील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार व हत्या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.या घटनेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक घटना आहे. आरोपीला अटक झाली आहे. आरोपीचे अशाप्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेतून समाजातून मोठा रोष आहे. सर्वांना या घटनेमुळे पीडित मुलीच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटतेय. आरोपीला अटक केली आहे, मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण नेऊ. स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हाय कोर्टाला विनंती करू, विशेष सरकारी वकील देऊन आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करणार आहोत.
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर बालिकेचा मृतदेह लपवण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी Devendra Fadnavis पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अशा अमानुष गुन्ह्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. दोषी आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी सरकार आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलणार आहे. तसेच तपास जलदगतीने पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पाडण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने आणि काटेकोरपणे केला जात असून आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजातूनही कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी याची मागणी जोर धरत आहे.