मुंबई
Raja Shivaji सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण करत आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी या ऐतिहासिक विषयावरील चित्रपटाची घोषणा केल्यानंतरच तो चर्चेत आला होता. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ११.३५ कोटी रुपयांची कमाई करत दमदार सुरुवात केली आहे.
दरम्यान, या चित्रपटाबाबत अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्यांनी चित्रपटाचे तसेच रितेश देशमुख यांच्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत चित्रपट पाहिल्यानंतरचे अनुभव मांडले.
या व्हिडीओमध्ये दिपाली सय्यद म्हणाल्या की, “महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी कालच ‘राजा शिवाजी’ चित्रपट पाहून आले. प्रीमियर होता. मला वाटते की हा एक अतिशय अप्रतिम सिनेमा आहे. रितेश विलासराव देशमुख यांनी खूप सुंदर काम केले आहे. त्यांना खूप ट्रोलही करण्यात आले होते, पण चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटते की ते पूर्णपणे योग्य नाही.”
त्या पुढे म्हणाल्या की, चित्रपटातील सर्व भूमिका—छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, सईबाई तसेच अफजलखान यांची व्यक्तिरेखा—अतिशय प्रभावीपणे साकारण्यात आली आहे. विशेषतः रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्याचे त्यांनी नमूद केले.
दिपाली सय्यद यांनी Raja Shivaji पुढे चित्रपटाच्या सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्वावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या महाराष्ट्राचा अभिमान आज आपण बाळगतो, तो त्यांच्या कार्यामुळेच आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवणे हे मोठे धाडसाचे काम असून निर्मात्यांचे त्यांनी कौतुक केले.त्यांनी प्रेक्षकांना आवाहन करत सांगितले की, प्रत्येकाने हा चित्रपट नक्की पाहावा आणि चित्रपटगृहात जाऊन त्याचा अनुभव घ्यावा.‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुख यांच्यासोबत जेनेलिया देशमुख, सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन आणि फरदीन खान यांसारख्या नामवंत कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत. ९० च्या दशकातील अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र आल्यामुळेही या चित्रपटाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.चित्रपटाच्या यशस्वी सुरुवातीमुळे आणि कलाकारांच्या प्रतिक्रियांमुळे ‘राजा शिवाजी’ सध्या बॉक्स ऑफिससह सोशल मीडियावरही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.