मध्यरात्री बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समन्वयाने हटविला

    दिनांक :02-May-2026
Total Views |
प्रशासनाची कारवाई : वाद निवळला

मारेगाव, 
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj गुरुवार, ३० एप्रिलच्या मध्यरात्री येथील मार्डी चौकातील रस्त्याच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. रस्त्याच्या मधोमध पुतळा बसवल्यामुळे वातावरण काही काळ अशांत झाले होते. परंतु प्रशासन, समन्वय समिती आणि जनप्रतिनिधींच्या समन्वयाने यावर तोडगा काढून वातावरण शांत करण्यात आले. ३० एप्रिलच्या मध्यरात्री शहरातील मुख्य चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा काही शिवप्रेमींकडून बसविण्यात आला. ही बातमी वार्‍यासारखी शहरात पसरली. पुतळा पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. यावेळी वणी, मुकुटबन, पांढरकवडा व येथून अतिरिक्त पोलिस कुमक तैनात होती.
 
 
putala
 
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj  घटनेचे गांभीर्य ओळखून पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार इंगोले, वणी येथील एसडीपीओ सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, मुकुटबन पोलिस निरीक्षक जाधव, तहसीलदार उत्तम निलावाड, पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे घटनास्थळी दाखल झाले. पुतळा हटवण्यास प्रारंभ होताच मारेगाव शहरातील वातावरण येथील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मुख्य चौकात गोळा व्हायला सुरुवात झाली. कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाल्यावर पोलिसांनीही चारही बाजूंनी रस्त्याची नाकेबंदी केल्याने संचारबंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुतळा हटवल्यानंतर शिष्टमंडळ व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय बैठक घेण्यात आली. शिष्टमंडळासोबत वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर तथा मनसे नेता राजू यांनीही समन्वय साधण्याचे काम केले.
पुतळा बसविण्यासाठी लवकरच बैठक घेऊ : मुख्याधिकारी सचिन गाडे
छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्यानंतर जमावाने मारेगाव बंदची हाक दिली होती. त्यानंतर पोलिस ठाण्यात समन्वयात्मक बैठक झाली. या बैठकीनंतर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी जमावासमोर उत्तर देतांना नवीन पुतळा बसविण्यासाठी लवकरच नवी जागा देण्यात येईल व परवानगी देतांना नगरपंचायत कसल्याही प्रकारे आडकाठी करणार नाही, असे सांगितले.
कारवाई न करता पुतळा बसविण्यात यावा : आ. संजय देरकर
पुतळा हटविल्यानंतर त्वरित नवीन अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या आहे. यासाठी स्मारक समिती बनविण्यात येईल. तसेच कोणत्याही आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यात येऊ नये.
परवानगी काढून रीतसर पुतळा बसविणार : राजू उंबरकर
छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात येईल. छ. शिवाजी महाराज यांचे विचार गावागावात पोहोचले पाहिजे. वाद करीत बसण्यापेक्षा पुतळा बसविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करू. यासाठी माझा सिंहाचा वाटा राहील.

समन्वय समितीसोबत झालेल्या चर्चेत कोणावरही गुन्हा दाखल होणार असे म्हणणार्‍या पोलिस प्रशासनाकडून रात्री कारवाई करीत पुतळा बसविणार्‍या ४ जणांवर, अनोळखी संशयित ८ जणांवर तर आंदोलन करणार्‍या ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली. दुपारपर्यंत यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.