संत लटारे महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरूवात

श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

    दिनांक :02-May-2026
Total Views |
कारंजा (घा.),
sant latare maharaj येथील ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेले संत विनायक उर्फ लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला १ मे पासून उत्साहात प्रारंभ झाला असून हा महोत्सव ९ मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्ताने श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून कथाव्यास साधक संजीव महाराज यांच्या सुमधूर वाणीतून ही कथा दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सादर होणार आहे.
 

sant latare maharaj 
 
 
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर कथा सप्ताहास प्रारंभ झाला. महोत्सव काळात दररोज काकडा आरती, अभिषेक, पूजापाठ, महाराजांची आरती, भागवत कथा, कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ८ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत वारकरी दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ९ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्त कारंजा शहरात प्रमुख मार्गांवर विद्युत रोषणाई, चौकाचौकात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संत लटारे देवस्थान तसेच सर्व भतांनी उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे.
संत लटारे महाराज यांचा जन्म माघ वद्य चतुर्थी, सन १८८४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव विनायक तांबोळी तर मूळ गाव नागपूर जिल्ह्यातील मोहपा असून वडील जयरामपंत तांबोळी व आई भीमाबाई या कारंजातील गाडगे घराण्यातील होत्या. लहानपणापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक प्रवृत्ती दिसून येत होती. शिक्षण केवळ प्राथमिकपर्यंत झाले असले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य नामस्मरण, साधना आणि समाजसेवेसाठी अर्पण केले. नारायण, नारायण, हरी हरी... हे नामस्मरण करत ते सतत भतिमय जीवन जगत होते. तरुण वयात केस वाढवल्यामुळे लोक त्यांना लटारे महाराज म्हणून ओळखू लागले.sant latare maharaj ते ब्रह्मचारी व विदेही संत होते. संकटसमयी लोकांना धीर देणे व योग्य मार्गदर्शन करणे ही त्यांची विशेषत: होती. त्यांचे मामा संत दादाजी महाराज गाडगे होते. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही त्यांना भेट दिल्याचे सांगितले जाते.
 
२३ मे १९६५ रोजी वैशाख वद्य सप्तमी या दिवशी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कारंजा गढी परिसरात समाधी मंदिर उभारण्यात आले असून पुढे संत सद्गुरू लटारे महाराज संस्थान स्थापन करण्यात आले. बसस्थानक परिसरात भत शंकरसिंग जाट खेनवार यांनीही महाराजांचे मंदिर उभारले आहे. कारंजा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या कारंजा (घा.) येथील संत लटारे महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव हा धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक असून काल, आज आणि उद्या या त्रिकालातही त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.