नवी दिल्ली,
100% of the questions match नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अंतर्गत चौकशीत रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी पूर्णपणे जुळल्याचे आढळून आल्याची चर्चा आहे. या प्रकरणानंतर एनटीएने केमिस्ट्री प्रश्नपत्रिका तयार करणारे प्राध्यापक आणि भाषांतर प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) चौकशीसाठी पाठवली आहे. माहितीनुसार, ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेनंतर काही दिवसांनी एनटीएला ईमेलद्वारे कथित फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ प्रत प्राप्त झाली होती. या दस्तऐवजाची मूळ प्रश्नपत्रिकेशी तुलना केल्यानंतर रसायनशास्त्र विषयातील प्रश्न मोठ्या प्रमाणात जुळत असल्याचे समोर आले. जीवशास्त्रातील काही प्रश्नांमध्येही साम्य आढळल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात सुमारे 26 ते 27 जणांची नावे चौकशीसाठी पुढे आली आहेत. त्यामध्ये विविध भाषांतील अनुवादकांसह प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. रसायनशास्त्रातील फिजिकल, ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक विभागांसाठी स्वतंत्र तज्ज्ञ नियुक्त करण्यात आले होते. नीट परीक्षा विविध भारतीय भाषांमध्ये घेतली जात असल्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या भाषांतरासाठी स्वतंत्र व्यवस्था असते. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अर्थ बदलू नये म्हणून दोन स्तरांवर भाषांतर तपासले जाते. मात्र, याच प्रक्रियेतून माहिती बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ‘अंतर्गत गळती’बाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नीट आता प्रश्नपत्रिका तयार करणारे आणि अनुवादक यांच्या पार्श्वभूमीची स्वतंत्र तपासणी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. आगामी पुनर्परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांतील प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या टीममध्ये बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात सीबीआयने नुकतेच पुण्यातील एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली असून, ते प्रश्नपत्रिका तयार करणे आणि भाषांतर प्रक्रियेत सहभागी असल्याचा संशय आहे. त्यामुळे तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका तयार करताना अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती. इंटरनेटविरहित सुरक्षित कक्षात पेपर तयार केला जात होता आणि संबंधितांना मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्यास मनाई होती. तरीही पेपरफुटी झाल्याच्या दाव्यांमुळे एनटीएच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.