मुंबई,
A Clear Message from Shashikant Shinde गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आता पूर्णविराम देण्यात आला आहे. यापुढे या विषयावर कोणतीही चर्चा केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदें यांनी मांडली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका स्पष्ट केली. विलीनीकरणाबाबत यापूर्वी काही स्तरांवर चर्चा झाली असली तरी आता पक्षाने हा विषय कायमस्वरूपी बंद केल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अनेक प्रमुख नेते, माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीचे जागावाटप आणि राज्यातील राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत अनेक नेत्यांनी विलीनीकरणाच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने एकमताने हा विषय थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.