गडचिरोली,
Amol from Gadchiroli Earns Boston Degree गडचिरोली जिल्ह्याला अभिमान वाटावा असे यश येथील अमोल प्रदीप देशमुख यांनी मिळवले असून त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून एमबीए आणि मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्स या दोन पदव्युत्तर पदव्या एकाचवेळी प्राप्त केल्या आहेत.गडचिरोली येथील रहिवासी असलेल्या अमोल देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण कार्मेल हायस्कूलमध्ये तर इयत्ता बारावीचे शिक्षण शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. पुढे बेंगळुरूमध्ये एका बँकेत त्यांनी एक वर्ष नोकरी केली, मात्र उच्च शिक्षणाची तीव्र इच्छा असल्याने त्यांनी परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

नोकरीसोबतच त्यांनी एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी केली आणि त्यात यश मिळवत बोस्टन विद्यापीठात प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी त्याच विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्स या अभ्यासक्रमालाही एकाच वेळी प्रवेश घेतला आणि दोन्ही पदव्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली परिसरात आनंदाचे वातावरण असून कुटुंबीय, शिक्षक आणि नागरिकांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे अमोल देशमुख हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.