नवी दिल्ली,
Cabinet Announced in Kerala केरळ सरकारमध्ये नवीन मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून राज्यपाल भवनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महत्त्वाच्या विभागांचे वाटप स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयानुसार मुख्यमंत्री म्हणून व्ही. डी. सतीशंकडे यांच्याकडे वित्त, कायदा, सामान्य प्रशासन आणि बंदरे यांसह सुमारे ३५ विभागांचा कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. राज्याच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णयांवर त्यांचे थेट नियंत्रण राहणार असल्याने सरकारच्या कामकाजात मुख्यमंत्री कार्यालयाची भूमिका अधिक प्रभावी ठरणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांच्याकडे गृह मंत्रालयासह दक्षता विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी यंत्रणांवर देखरेख करणाऱ्या दक्षता विभागासह इतर काही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही त्यांच्या कडे असेल. याशिवाय पी. के. कुन्हालीकुट्टी यांच्याकडे उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि वस्त्रोद्योग यांसह एकूण सात विभाग देण्यात आले आहेत. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष सनी जोसेफ यांच्याकडे वीज आणि पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. के. मुरलीधरन यांची आरोग्य आणि देवस्वम खात्याच्या मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली असून रोझी एम. जॉन उच्च शिक्षण विभाग सांभाळतील. ए. पी. अनिल कुमार यांच्याकडे भूमी आणि महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच शम्सुद्दीन यांची सामान्य शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.