मोनॅको,
Cars will run on water जागतिक स्तरावर वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर आता पर्यायी आणि इंधन बचतीच्या तंत्रज्ञानाकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. अशातच मोनॅको-स्थित 'फोवे इको सोल्युशन्स'या कंपनीने विकसित केल्याचा दावा केलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे वाहन आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानाच्या मदतीने इंधनात पाण्याचा विशिष्ट प्रमाणात वापर करून इंधनाचा वापर कमी करता येऊ शकतो. ‘कॅविटेक फ्यूल इमल्शन’ असे या पेटंट तंत्रज्ञानाचे नाव असून त्याद्वारे इंधन आणि पाणी एका विशेष प्रक्रियेत मिसळले जाते.

या प्रक्रियेमुळे इंधनामध्ये अतिशय सूक्ष्म पाण्याचे थेंब तयार होतात. इंधन जळताना हे थेंब सूक्ष्म स्फोट निर्माण करतात, ज्यामुळे इंधन अधिक कार्यक्षमतेने जळते. परिणामी इंधनाचा वापर कमी होतो आणि प्रदूषणही कमी प्रमाणात होते, असा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी इंजिनमध्ये मोठे बदल करण्याची गरज नसल्याचेही सांगितले जात आहे. कंपनीच्या चाचण्यांमध्ये औद्योगिक बॉयलर आणि समुद्री इंजिनांमध्ये 6 ते 10 टक्क्यांपर्यंत इंधन बचत झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.
भारतासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान
भारतासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे मानले जात आहे, कारण देशाला मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करावी लागते. त्यामुळे इंधन बचतीशी संबंधित कोणतीही नवी प्रणाली देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते.काही भारतीय रिफायनरी आणि स्टील प्रकल्पांमध्येही या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये काही प्रमाणात इंधन बचत नोंदवण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.याशिवाय, या तंत्रज्ञानामुळे NOx आणि SOx सारख्या हानिकारक वायूंचे उत्सर्जन कमी होऊ शकते. औद्योगिक यंत्रणांमध्ये घाण कमी साचल्यामुळे देखभाल खर्चही घटू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या हे तंत्रज्ञान सामान्य वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात नसले तरी जहाजे, औद्योगिक यंत्रणा आणि वीज प्रकल्पांमध्ये त्याच्या चाचण्या सुरू आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.