महाराष्ट्रात आंदोलनांचा एल्गार.. रुग्णांची गैरसोय

    दिनांक :20-May-2026
Total Views |
मुंबई
AIOCD strike ऑनलाइन औषध विक्री, ई-फार्मसी आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींच्या विरोधात देशभरातील केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी बुधवारी देशव्यापी बंद पुकारला. या बंदला महाराष्ट्रासह देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने हजारो मेडिकल स्टोअर्स दिवसभर बंद ठेवण्यात आली. अनेक शहरांमध्ये औषध विक्रेते रस्त्यावर उतरले असून मूक मोर्चे, धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मेडिकल स्टोअर्स बंद असल्याने अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळाले.
 

AIOCD strike  
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनानुसार हा बंद पुकारण्यात आला होता. ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात येत असून बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांची विक्री वाढत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे. कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी लागू करण्यात आलेल्या जीएसआर २२० (ई) अध्यादेशाचा गैरवापर होत असल्याचाही दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
 
 
सोलापुरात हुतात्मा AIOCD strike  स्मारकापासून औषध विक्रेत्यांनी मोर्चा काढत आंदोलन केले. माढा तालुक्यातील सुमारे ६०० तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील साडेआठ हजारांहून अधिक विक्रेत्यांनी दुकानांना कुलूप लावत बंदमध्ये सहभाग घेतला. करमाळा येथे औषध विक्रेत्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही ठिकाणी आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले.पुण्यातील रास्ता पेठ परिसरातील पॉवर हाऊस चौकात औषध विक्रेत्यांनी निदर्शने केली. पिंपरी-चिंचवड शहरात मेडिकल बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहरातील जवळपास सर्व मेडिकल दुकाने बंद होती. आपत्कालीन औषध विक्रीची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सांगली जिल्ह्यात चार हजारांहून अधिक मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली. सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील मेडिकल दुकाने बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी भटकंती करावी लागली. अनेकांनी मेडिकल बंदमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल संताप व्यक्त केला.
 
 
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी AIOCD strike  महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. साताऱ्यातही औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती लावून कराड शहरातून मूक मोर्चा काढला आणि तहसीलदारांना निवेदन दिले. जिल्ह्यातील सुमारे ३२०० घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.नंदुरबार, जळगाव, अमरावती, नागपूर, जालना, बीड, रायगड आणि कोकणातील विविध जिल्ह्यांतही बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. जळगावमध्ये औषध विक्रेत्यांनी काळ्या टोप्या घालून आणि डफडं वाजवत ऑनलाइन औषध विक्रीविरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शने करण्यात आली, तर अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये हेडगेवार चौकासह संपूर्ण जिल्ह्यातील मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली. कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील सुमारे चार हजार मेडिकल चालकांनी संपात सहभाग घेतल्याची माहिती समोर आली.
 
 
 
 
औषध विक्रेत्यांच्या या AIOCD strike  देशव्यापी आंदोलनामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये रुग्णांचे हाल झाले. विशेषतः सरकारी रुग्णालयांमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक औषधे मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. काही ठिकाणी आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांना औषधांसाठी अडचणींचा सामना करावा लागला.दरम्यान, सरकारने ऑनलाइन औषध विक्रीबाबत कठोर नियम लागू करावेत, बनावट औषधांवर नियंत्रण आणावे आणि पारंपरिक मेडिकल व्यवसायाचे संरक्षण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र आणि बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही औषध विक्रेता संघटनांनी दिला आहे.