तभा वृत्तसेवा
महागाव,
clash-between-police-and-bjym : महागाव शहर व तालुक्यात कथितपणे सुरू असलेल्या अवैध धंदे, मटका आणि जुगार व्यवसायावरून आता पोलिस प्रशासन आणि राजकीय पदाधिकारी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. महागावचे ठाणेदार धनराज निळे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) जिल्हा उपाध्यक्ष विशाल डहाळे यांच्यातील हा संघर्ष आता थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या दालनात पोचल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल डहाळे यांनी महागाव शहर व तालुका परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत, पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती.
मात्र, या तक्रारीनंतर पोलिस आणि डहाळे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. डहाळे यांच्या या तक्रारींमागे कोणताही सामाजिक हेतू नसून, वैयक्तिक आकस आणि पूर्वग्रहातून या तक्रारी केल्या असल्याचा दावा महागाव पोलिसांकडून वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विशाल डहाळे यांच्यावर पूर्वी कौटुंबिक वादातून गुन्हे दाखल झाले असल्याने ते पोलिसांवर दबाव आणण्यासाठी आणि स्वतःची बाजू वरचढ करण्यासाठी खोट्या तक्रारी करत असल्याचे स्पष्टीकरण ठाणेदार धनराज निळे यांनी वरिष्ठांना दिल्याची चर्चा आहे. ठाणेदारांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या विशाल डहाळे यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांचे दार ठोठावले असून, ठाणेदार निळे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
अवैध धंद्यांच्या मुद्यावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ पोलिस ठाण्यापुरता मर्यादित राहिला नसून, त्याला राजकीय आणि प्रशासकीय स्वरूप आले आहे. एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलिस आणि दुसèया बाजूला सत्ताधारी पक्षाचे आक्रमक पदाधिकारी समोरासमोर आल्याने महागावमधील वातावरण चांगलेच तापले आहे.
आता या हायप्रोफाईल प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
माझी बदनामी करण्याचा प्रयत्न
मी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील भ्रष्टाचार, अवैध धंदे आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आलो आहे. माझी भूमिका ही वैयक्तिक नसून सामाजिक आहे. माझ्या कौटुंबिक वादाचा संदर्भ देऊन ठाणेदारांकडून करण्यात आलेले वक्तव्य अत्यंत बदनामीकारक, पूर्वग्रहदूषित आणि माझी सामाजिक प्रतिमा मलीन करणारे आहे. आपल्या विरोधात कोणताही गुन्हा अद्याप न्यायालयात सिद्ध झालेला नसताना, पोलिसांकडून अप्रत्यक्षपणे गुन्हेगार ठरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. तसेच महागावातील कथित अवैध धंद्यांची आणि यात ठाणेदारांच्या भूमिकेची वरिष्ठ पातळीवरून नि:पक्ष चौकशी व्हावी.
विशाल डहाळे
जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो
पूर्वीपेक्षा जास्त कारवाया
महागाव तालुक्यातील अवैध धंद्यावर वारंवार कारवाई केल्या जाऊन अवैध धंदे बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे करण्यात आलेल्या कारवायांचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त आहे. माहिती मिळताच आम्ही प्रत्येक वेळी कारवाई करतच आहोत.
धनराज निळे
ठाणेदार, महागाव पोलिस ठाणे