कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर उडवली खळबळ

    दिनांक :20-May-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
Cockroach Janata Party सोशल मीडियावर मागील 72 तासांत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या नावाने ओळखला जाणारा एक उपहासात्मक राजकीय ट्रेंड प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून, देशभरातील तरुणांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. या डिजिटल चळवळीने अवघ्या तीन दिवसांत एक लाखांहून अधिक तरुणांना आकर्षित केले असून, इन्स्टाग्रामवर तब्बल 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. या संपूर्ण ट्रेंडच्या केंद्रस्थानी छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय अभिजीत दीपके असल्याचे सांगितले जात आहे.
 

Cockroach Janata Party, CJP viral trend, 
अभिजित दीपके आहे तरी कोण?
 
 
अभिजीत दीपके हा व्यावसायिक राजकीय संवाद रणनीतिकार असून त्याने पुण्यातून पत्रकारितेत पदवी घेतल्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले आहे. बोस्टन विद्यापीठातून त्याने जनसंपर्क (पीआर) विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय संदेश आणि डिजिटल कॅम्पेनिंगमध्ये त्याला पूर्वीपासून अनुभव असल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, 2020 ते 2022 या काळात तो आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीमशी संबंधित असल्याचे तसेच दिल्ली शिक्षण विभागासाठी संवाद सल्लागार म्हणून काम केल्याचा उल्लेखही केला जात आहे.
 
 
‘कॉकरोच जनता पार्टी’ची कल्पना एका न्यायालयीन टिप्पणीमधून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. 15 मे 2026 रोजी बनावट पदव्यांशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काही बेरोजगार लोक प्रणालीमध्ये ‘झुरळांप्रमाणे’ घुसखोरी करतात अशी टिप्पणी केल्याचे समजते. नंतर त्यांनी ही टिप्पणी सामान्य बेरोजगार तरुणांना उद्देशून नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, सोशल मीडियावर या विधानाचे तीव्र पडसाद उमटले.या पार्श्वभूमीवर बेरोजगारी, पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांबाबत वाढत चाललेल्या असंतोषाच्या वातावरणात अभिजीत दीपके यांनी 16 मे रोजी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या उपहासात्मक पोस्टमधून या ट्रेंडची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. “जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल?” या आशयाची पोस्ट करत त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’साठी एक वेबसाइट आणि गुगल फॉर्म सुरू केला होता.
 
 
या उपहासात्मक Cockroach Janata Party  चळवळीत सदस्यत्वासाठी ठेवण्यात आलेल्या निकषांमध्ये बेरोजगार असणे, सतत ऑनलाइन सक्रिय असणे आणि तक्रार करण्याची क्षमता असणे अशा अटींचा उल्लेख करण्यात आला आहे. या विचित्र पण लक्षवेधी संकल्पनेमुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झाले असून, अनेकांनी याला सामाजिक उपहास आणि डिजिटल आंदोलनाचा नवा प्रकार म्हणून पाहिले आहे.या ट्रेंडला काही राजकीय नेत्यांकडूनही सोशल मीडियावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या काही नेत्यांनी या उपहासात्मक प्रवाहावर प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीने ‘कॉकरोच जनता पार्टी’ला एक विनोदी डिजिटल चळवळ म्हणून सुरुवात झाली असली तरी, ती आता बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या मानसिक तणावासारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या या ट्रेंडमुळे डिजिटल राजकारणाच्या नव्या स्वरूपावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.