नागपूर,
Arya Avadhut जिद्द, बुद्धिमत्ता, संस्कार आणि आत्मविश्वासाच्या बळावर नागपूरची आर्या अवधूत राष्ट्रीय सौंदर्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. ‘मिस टीजीपीसी इंडिया’ या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवत तिने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आता या स्पर्धेच्या भव्य अंतिम फेरीसाठी तिची वाटचाल बंगळुरूकडे सुरू झाली असून आर्यावर शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी आर्याने केवळ सौंदर्यामुळे नव्हे, तर आपल्या बुद्धिमत्ता, शिस्तबद्ध जीवनशैली आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या नेतृत्वगुणांची झलक लहानपणापासूनच दिसून आली होती. वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील उदयोन्मुख लेखिका आणि वाचक नेतृत्व स्पर्धेत विजेतेपद पटकावत तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. शब्दांवरील प्रभुत्व, प्रभावी अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास यामुळे ती सतत प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे.
आर्या सध्या एकाच वेळी संगणक विज्ञान अभियांत्रिकी आणि व्यवसाय व्यवस्थापन या दोन शाखांमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. कठोर अभ्यासासोबतच ती नृत्य, चित्रकला आणि वाद्यवादन यांसारख्या कलांमध्येही सक्रिय असून तिच्या व्यक्तिमत्त्वातील सर्जनशील पैलू अधिक ठळकपणे समोर येत आहेत.
देशसेवेची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील संस्कार आर्याच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून येतात.Arya Avadhut तिचे आजोबा सैन्यात कार्यरत होते, तर वडील नितीन अवधूत पोलीस दलात सेवा बजावत आहेत. त्यामुळे देशभक्ती, शिस्त आणि समर्पण ही मूल्ये तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहेत.
अंतिम पाचमध्ये पोहोचण्यामागे अथक परिश्रम, सातत्य आणि स्वतःवरील विश्वास असल्याचे आर्या सांगते. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे तिचे स्वप्न आहे. सौंदर्यस्पर्धेला ती केवळ मुकुट जिंकण्याची शर्यत न मानता भारताचा आत्मा जगासमोर मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ मानते. तिच्या या यशामुळे नागपूरच्या तरुणाईसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.