धारदार शस्त्राने धाबा चालकाचा खून

    दिनांक :20-May-2026
Total Views |

we45
 
गोंदिया, 
Dhaba Owner Murdered ढाबा चालकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील रावणवाडी येथे १९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बुधवारी २० मे रोजी सकाळी ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकुमार मदन हरीणखेडे (४५) रा. रावणवाडी असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार यांचा गावापासून काही अंतरावर ढाबा (भोजनालय) असून त्यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यातच काल, मंगळवारी रात्री धाबा बंद करून ते झोपी गेले असता, झोपेतच अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. आज, बुधवारी सकाळी हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी राजकुमार यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.