रिसोड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा २५ जणांवर हल्ला

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

    दिनांक :20-May-2026
Total Views |
रिसोड, 
Dog Attack in Risod City रिसोड शहर व तालुयातील बिबखेडा येथे मोकाट कुत्र्याने अक्षरशः हैदोस घालत तब्बल २५ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर असे की, तालुयातील बिबखेडा येथे सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास बिबखेडा येथील मंगेश गजानन कुटे (वय ३५) यांच्या सहा वर्षीय मुलगी वीरा हिला कुत्र्याने चावा घेतला. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या मंगेश कुटे यांच्यावरही कुत्र्याने हल्ला करून चेहरा, नाक व डोळ्याखाली गंभीर जखमा केल्या. त्यांना प्रथम रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी वाशीम येथे हलविण्यात आले.
 
 
 
Dog Attack in Risod City
 
 
यानंतर सदर कुत्र्याने रिसोड शहरातील आसन गल्ली, चांदणी चौक, लोणी फाटा, रामनगर आदी भागांत नागरिकांवर हल्ले करत धुमाकूळ घातला. अनेकांच्या पायाला चावा घेतला गेला. काही नागरिक हे ग्रामीण भागातून कामानिमित्त शहरात आलेले होते. लोणी फाटा परिसरात आंबे विक्री करणार्‍या एका महिलेलाही कुत्र्याने हल्ला करून जखमी केले. संतप्त नागरिकांनी संबंधित कुत्र्याला ठार मारल्याची माहिती समोर आली असून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने त्याचा मृतदेह दफन केल्याचे सांगितले आहे. रिसोड शहरात वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वाहनांसमोर धावणे, लहान मुलांवर झेप घेणे, पादचार्‍यांवर हल्ले करणे या घटना सातत्याने घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नगरपरिषदेकडे वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 
 
 
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने १९ मे रोजी पिसाळलेल्या, अत्यंत आजारी किंवा मानवी जीवनासाठी धोकादायक भटया कुत्र्यांबाबत दयामरणाचा पर्याय वापरण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर रिसोडमधील ही घटना अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांच्या जीविताला धोका असल्यास प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे. या घटनेत जखमी झालेल्यामध्ये मंगेश गजानन कुटे, वीरा मंगेश कुटे, आदेश ठाकरे, राहुल मधुकर जोशी, सुनीता अशोक बोराडे, प्रथमेश रवींद्र झडपे, विश्वनाथ ज्ञानबा बर्डे, मंगेश कुंडलिक काकडे, अब्दुल वहाब अब्दुल गणी, विजय जनार्दन जुमडे, भिकाजी बळीराम वाळके, शिवहरी निवृत्ती खडसे, लता शेषराव खरात, शुभम रामदास तिडके, राहुल किसन मानकर आणि ज्ञानेश्वरी खंडारे यांचा समावेश आहे.