परतवाडा - धारणी मार्गालगत जंगलाची राखरांगोळी
धारणी,
Fire in Harisal Forest Range मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभागाच्या हरीसाल वनपरीक्षेत्रात भीषण वनवा लागल्याने मोठ्या प्रमाणावर जंगल जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. परतवाडा ते धारणी या मुख्य मार्गालगत असलेल्या जंगल परिसरात आग लागल्याने संपूर्ण परिसर धुराने व्यापला होता. उन्हाळ्याच्या तीव्र तापमानात लागलेल्या या आगीमुळे वनसंपदा, लहान वन्यजीव व पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Fire in Harisal Forest Range दरम्यान, मेळघाट भ्रमणावर असलेले खोज संस्थेचे संस्थापक अॅड. बंड्या साने यांनी घटनास्थळाचे व्हिडीओ व माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली. संबंधित पोस्टमध्ये त्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना माहिती देऊनही घटनास्थळी अधिकारी व कर्मचारी आग विझविण्यासाठी वेळेवर पोहोचले नसल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परतवाडा-धारणी मार्गालगत अनेक ठिकाणी जंगलात आग लागल्याचे दिसून आले. वार्याचा वेग अधिक असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. त्यामुळे काही काळ वाहनचालकांनाही धुरामुळे अडचणींचा सामना करावा लागला. वनविभागाकडून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, वनवा नेमका कशामुळे लागला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे मेळघाटातील जंगल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.