गडचिरोली,
Gadchiroli's Health Revolution ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. याच मोहिमेला मूर्त रूप देण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेने प्रभावी पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील सर्व 459 ग्रामपंचायतींनी या मोहिमेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. ना. प्रकाश आंबिटकर यांनी मांडलेल्या ‘आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेचा मूळ उद्देश प्रत्येक खेडे आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि आजारमुक्त बनवणे हा आहे. या संकल्पनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे स्वतः लक्ष घालत असून, दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व 459 ग्रामपंचायतींच्या सहभागामुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सुधारेल आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘आरोग्य संपन्न’ गाव निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग जिल्ह्यात विविध आरोग्यवर्धक उपक्रम राबवणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वसमावेशक आरोग्य तपासणी, कुटुंब कल्याण कार्यक्रम, प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी उपक्रम राबविणार आहेत.
आरोग्य संपन्न गावाची संकल्पना ही लोकसहभागाशिवाय अपूर्ण आहे. जेव्हा ग्रामपंचायत, प्रशासन आणि नागरिक एकत्र येतात, तेव्हाच खर्या अर्थाने आरोग्य क्रांती घडते. गडचिरोली जिल्हा प्रशासन या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे. माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी या आरोग्य चळवळीत स्वतःला झोकून द्यावे आणि आपले गाव निरोगी व समृद्ध बनवावे.
अविश्यांत पंडा
जिल्हाधिकारी, गडचिरोली
ना. प्रकाश आंबिटकर यांच्या संकल्पनेतील ‘आरोग्य संपन्न गाव’ साकारण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. जिल्ह्यातील 459 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग हा या मोहिमेच्या यशस्वीतेचा मोठा पुरावा आहे.
सुहास गाडे
मुख्य कार्यकारी अधिकारी
ग्रामपंचायतींशी संवाद आणि प्रशासकीय आवाहन
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांनी या मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींशी संवाद (डायलॉग) साधून त्यांना मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक गावाने आपले आरोग्यविषयक उद्दिष्ट साध्य करून हे अभियान एका लोकचळवळीच्या स्वरूपात राबवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.