छंदातून उभा राहिला व्यवसाय..!

-प्रणिता जोशींनी महिलांना दिले ‘स्कूटीचे पंखं’ -16 वर्षांच्या मुलींपासून 60 वर्षीयांपर्यंत 150 जणींना प्रशिक्षण

    दिनांक :20-May-2026
Total Views |
तभा वृृत्तसेवा
यवतमाळ, 
pranitha-joshi : घर सांभाळताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न अनेक गृहिणी पाहतात. मात्र त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस काहीजणीच करतात. अशाच धाडसी प्रयत्नातून प्रणिता जोशी यांनी स्कूटी प्रशिक्षणाचा व्यवसाय उभा करत महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
 
 
y20May-Pranita
 
 
 
सुरुवातीला केवळ छंद म्हणून सुरू केलेले स्कूटी प्रशिक्षण आज त्यांच्या व्यवसायाचे रूप घेत असून आतापर्यंत तब्बल 150 महिलांना त्यांनी स्कूटी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे 16 वर्षांच्या मुलींपासून ते 60 वर्षांच्या महिलांपर्यंत अनेक जणींनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मविश्वासाने वाहन चालविणे शिकले.
 
 
महिलांना स्वतंत्रपणे प्रवास करता यावा, आत्मनिर्भर बनावे आणि दैनंदिन जीवनात कोणावर अवलंबून राहू नये, या उद्देशाने प्रणिता जोशी यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या संयमी आणि आत्मीयतेच्या प्रशिक्षण पद्धतीमुळे अनेक महिलांनी भीतीवर मात करत स्कूटी चालविणे आत्मसात केले.
 
 
या व्यवसायासाठी त्यांना कुटुंबाची भक्कम साथ लाभली. घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच हा उपक्रम आज नावारूपाला आला असून, प्रशिक्षणासाठी अनेक इच्छुक महिलांची प्रतीक्षा यादीदेखील तयार झाली आहे. आज प्रणिता जोशी या केवळ प्रशिक्षक नाहीत, तर अनेक महिलांच्या आत्मविश्वासाला नवे पंख देणारे नाव बनल्या आहेत.
सायकलही येत नव्हती, आज आत्मविश्वासाने स्कूटी चालवतात
 
 
आजच्या काळात अनेक विद्यार्थी स्कूल बसने शाळेत ये-जा करतात. त्यामुळे काहींना सायकल चालविण्याचाही अनुभव नसतो. अशा महिला आणि मुलींना थेट स्कूटी शिकविणे हे मोठे आव्हान असल्याचे प्रशिक्षक प्रणिता जोशी सांगतात.
सुरुवातीला अनेक जणी घाबरलेल्या असतात. काहींना तर सायकलही चालविता येत नाही. मात्र योग्य मार्गदर्शन, संयम आणि सातत्यपूर्ण सरावामुळे त्या आत्मविश्वासाने स्कूटी चालवू लागतात, असे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे, सुरुवातीला भीती वाटणाèया अनेक महिलांनी आज स्वतःची वाहतूक स्वतः करण्याइतका आत्मविश्वास मिळविला आहे.

प्रणिता जोशी, प्रशिक्षक