अकोला,
illegal hoarding अकोला-विनापरवाना जैविक उत्प्रेरकाची अवैध साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या अनधिकृत गोदामावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार, १९ रोजी दुपारी ३ वाजता धाड टाकून ९२ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी मध्यरात्री एमआयडीसी पोलिसात कंपनीवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी आपल्या पथकासह एमआयडीसी क्रमांक ४, मधील ऍग्रोटॉनिक एसीएन कंपनीच्या अनधिकृत गोदामावर छापा टाकला. यावेळी त्यांना २७ प्रकारच्या जैव उत्प्रेरकाचा ३८२७.५० लिटर म्हणजे ३११४१ किलो साठा आढळून आला.यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी उत्पादनाचा परवाना, गोडाऊन करारनामा, नोंदवही याबाबत विचारणा केली असता यापैकी काहीच दिसून आले नाही.त्यामुळे हा साठा जप्त करून विक्री बंद करण्यात आला. तसेच गोदामाला देखील सील लावण्यात आले.
ही कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद सीईओ अनिता मेश्राम, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.मुरली इंगळे, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, कृषी अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, गुणनियंत्रक सतीशकुमार दांडगे, कृषी अधिकारी पंस रोहिणी मोघाड, पंकज जगताप, पंकज झरे यांनी केली.
कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. त्या पृष्ठभूमीवर बी- बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. दर्जेदार खते बियाणे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.illegal hoardingत्यातच अकोल्यात अवैधरित्या कृषी उत्पादनाची साठेबाजी व विक्री होत असल्याचे उघड झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी कृषी अधिकारी सुधाकर खंडारे यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ऍग्रोटॉनिक एशियन कंपनी अहमदाबाद विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून गोदाम सील करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी दुपारी ३ वाजता सुरू झालेली कारवाई सायंकाळी ६ वाजता संपली.तब्बल तीन तास प्रचंड गुप्तता पाळून कृषी विभागाने ही कारवाई केली. त्यानंतर मध्यरात्री दोन च्या सुमारास एमआयडीसी पोलिसात कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.