चांदीपूर,
India's Suryastra Test भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी बुधवारी महत्त्वाचा दिवस ठरला, जेव्हा देशात विकसित करण्यात आलेल्या ‘सूर्यस्त्र’ या अत्याधुनिक रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी पार पडली. ओडिशातील चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून ही चाचणी करण्यात आली. या रॉकेटने सुमारे 300 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अत्यंत अचूकतेने भेदत भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर घातली आहे. विशेष म्हणजे, ही प्रणाली खासगी क्षेत्रातील निबे लिमिटेड या भारतीय संरक्षण कंपनीने विकसित केली आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी हे एक मोठे यश मानले जात आहे. संरक्षण क्षेत्रात सरकारी संस्थांबरोबरच खासगी कंपन्याही आता अत्याधुनिक शस्त्रनिर्मितीत पुढे येत असल्याचे या यशातून स्पष्ट झाले आहे.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीदरम्यान डागण्यात आलेल्या दोन्ही रॉकेट्सनी लक्ष्य अचूकपणे भेदले. या क्षेपणास्त्राची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूकता. लष्करी भाषेत ज्याला ‘सर्क्युलर एरर प्रोबेबल’ (CEP) म्हटले जाते, त्या निकषावर सूर्यस्त्रने अत्यंत कमी त्रुटी नोंदवली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इतक्या लांब अंतरावरून डागण्यात आलेले हे रॉकेट मूळ लक्ष्यापासून अवघ्या दीड ते दोन मीटर अंतरात जाऊन आदळले. लांब पल्ल्याच्या रॉकेट प्रणालीसाठी ही अचूकता अत्यंत प्रभावी मानली जाते. त्यामुळे शत्रूच्या ठिकाणांवर थेट हल्ला करून आसपासच्या भागाचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, आधुनिक युद्धामध्ये अशा मार्गदर्शित रॉकेट प्रणाली अत्यंत निर्णायक ठरत आहेत. शत्रूचे तळ, दळणवळण व्यवस्था आणि लष्करी पायाभूत सुविधा क्षणार्धात उद्ध्वस्त करण्याची क्षमता या प्रणालींमध्ये असते. भारतात यापूर्वी बहुतेक क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणाली सरकारी संस्थांमार्फत विकसित केल्या जात होत्या. मात्र आता खासगी कंपन्याही संरक्षण क्षेत्रात मोठी भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसत आहे. सूर्यस्त्रच्या यशस्वी चाचणीनंतर हे रॉकेट लवकरच भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.