उन्हाळ्यातील थंडावा देणारे ‘काला खट्टा’ ड्रिंक

जांभळापासून घरीच बनवा आंबटगोड सरबत

    दिनांक :20-May-2026
Total Views |
उन्हाळ्याच्या वाढत्या उकाड्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आणि चवीला आंबटगोड असलेल्या पेयांना मोठी मागणी असते. अशा पेयांमध्ये ‘काला खट्टा’ ड्रिंक हे विशेष लोकप्रिय असून, रस्त्यावरील स्टॉल्सपासून ते रेस्टॉरंटपर्यंत याची मागणी कायम दिसून येते. मात्र हेच चविष्ट आणि ताजेतवाने करणारे पेय घरच्या घरीही सहज तयार करता येऊ शकते.
 

kala khatta drink recipe, homemade kala khatta syrup, 
काळ्या जांभळापासून तयार होणाऱ्या या ड्रिंकला त्याच्या खास रंगामुळे आणि चवदार मिश्रणामुळे विशेष ओळख मिळाली आहे. जांभळाचा नैसर्गिक गोडवा, लिंबाचा आंबटपणा आणि मसाल्यांचा झणझणीत स्वाद यांचा सुंदर संगम या पेयात पाहायला मिळतो.
 
 
जांभूळ- अर्धा किलो
साखर -१ कप
पाणी- 2 ते 3 मोठे चमचे
काळे मीठ - दीड चमचा
भाजलेली जिरे पूड 1 चमचा
लिंबाचा रस -2चमचे
चाट मसाला - 1 चमचा
 
 
हे सरबत तयार करण्यासाठी प्रथम जांभळाचा गर काढून त्याची प्युरी तयार केली जाते. ही प्युरी थोड्या साखरेसह मंद आचेवर काही मिनिटे शिजवली जाते, ज्यामुळे त्याचे सिरप तयार होते. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात काळे मीठ, भाजलेली जिरेपूड, चाट मसाला आणि लिंबाचा रस मिसळला जातो. हे सर्व घटक एकत्र केल्यावर तयार होणारा सिरप गाळून बाटलीत साठवता येतो आणि फ्रिजमध्ये ठेवून अनेक दिवस वापरता येतो.सर्व्ह करताना या सिरपचे काही चमचे थंड पाणी किंवा सोड्यासोबत मिसळले जातात. त्यात बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घातल्यास त्याची चव अधिक ताजीतवानी आणि आकर्षक होते. उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे हे पेय केवळ चविष्टच नाही तर घरी सहज उपलब्ध घटकांमुळे आर्थिकदृष्ट्याही परवडणारे ठरते.
आरोग्यदायी आणि नैसर्गिक फळांचा वापर असल्याने ‘काला खट्टा’ हे पेय सध्या घरगुती पातळीवरही लोकप्रिय होत असून, अनेक जण बाजारातील पेयांना पर्याय म्हणून हे घरगुती सरबत पसंत करत आहेत.