भोपाळ,
Letter from the Police to Twisha's Family ट्विशा शर्मा प्रकरणात आता एक नवीन घडामोड समोर आली असून, पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना मृतदेह तातडीने ताब्यात घेण्याची विनंती केली आहे. 13 मेपासून एम्स भोपाळच्या शवागारात ठेवण्यात आलेला मृतदेह दीर्घकाळ तिथेच असल्याने तो कुजण्याची शक्यता वाढल्याचे पोलिसांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. कुटुंबीयांना पाठवलेल्या पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले की, मृतदेह सध्या एम्स भोपाळच्या शवागारात उणे 4 अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्यात आला आहे. मात्र मृतदेह अधिक काळ सुरक्षित ठेवण्यासाठी उणे 80 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते आणि अशी सुविधा संबंधित रुग्णालयात उपलब्ध नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे मृतदेहाची स्थिती बिघडू नये म्हणून तो तातडीने घेऊन जाण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती पोलिसांनी कुटुंबीयांकडे केली आहे. तसेच, दुसरे शवविच्छेदन करण्यास पोलिसांचा कोणताही आक्षेप नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, 13 मे रोजी करण्यात आलेल्या पहिल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे प्राथमिक कारण गळफास असल्याचे नमूद करण्यात आले होते. अहवालानुसार, मृत्यूपूर्वी शरीराच्या काही भागांवर किरकोळ जखमा झाल्याचेही आढळून आले आहे. वैद्यकीय अहवालात मानेच्या डाव्या बाजूवर ओरखडे तसेच हात, मनगट आणि बोटांवर किरकोळ जखमांची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय मंडळाने या जखमा मृत्यूपूर्वी झालेल्या असल्या तरी त्या गंभीर स्वरूपाच्या नसल्याचे नमूद केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण चर्चेत आले असून, कुटुंबीय पुढे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.