तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
medicine-shops-closed : देशातील औषध व्यवसाय सध्या मोठ्या संक्रटातून जात असून ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक मेडिकल दुकानदारांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार, 20 मे रोजी देशभरातील सुमारे 13 लाख औषध विक्रेत्यांनी भारत बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व म्हणजे 2 हजार 558 दुकाने बुधवारी बंद होती.
भारतीय औषध उद्योगाने गेल्या काही दशकांत मोठी प्रगती केली आहे. जेनेरिक औषध निर्मितीत भारताने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. याचबरोबर विविध कंपन्यांनी भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळख मिळवून दिली. मात्र आज बदलत्या बाजारपेठेमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यवतमाळ येथे औषध विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला.
संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, की ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. मोठ्या ई-फार्मसी कंपन्या मोठ्या प्रमाणावर सवलती देत असल्याने छोट्या मेडिकल दुकानदारांचे उत्पन्न घटत आहे.
त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची खरेदी वाढत असून चुकीच्या औषध वापराचा धोका वाढतो आहे. औषध विक्रेत्यांच्या मते, अनधिकृत वेबसाइट्समुळे बनावट औषधांचा धोका वाढत असून स्थानिक फार्मासिस्टकडून मिळणारे वैयक्तिक मार्गदर्शनही कमी होत आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होत आहे. यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दारव्ह्यात केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचा बंद यशस्वी
औषधी विक्रेता संघटनेतर्फे बुधवार, 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या औषधी विक्रेता बंदबाबत विविध शासकीय व वैद्यकीय विभागांना निवेदन सादर केले. हा बंद यशस्वी झाल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. ऑनलाईन औषध विक्री, ई-पोर्टल व बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीमुळे औषध व्यवसायास तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास निर्माण होणाèया धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला होता. शासनाने याबाबत तातडीने योग्य निर्णय घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. दारव्हा येथील मेडप्लससारख्या मोठ्या साखळी दुकानानेही या बंदमध्ये सहभाग दर्शवित बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने संघाटनेला मोठे यश मिळाल्याची भावना पदाधिकाèयांनी व्यक्त केली. या बंदला तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाèयांनी दिली. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहतील यासाठी आवश्यक काळजी घेण्यात आल्याचे सांगितले.
दिग्रसमध्ये औषध विक्रेता संघाचा कडकडीत बंद
दिग्रस : अ.भा. औषध विक्रेता संघटनेने देशात व राज्यात बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत पुकारलेल्या बंदला बुधवार, 20 मे रोजी दिग्रस औषध विक्रेता संघाने प्रतिसाद देत कडकडीत बंद ठेवला. तहसीलदार मयूर राऊत यांना दिलेल्या निवेदनात ई-पोर्टल व जीएसआर 817 (ई), 28 ऑगस्ट 2018 तसेच कोविड जीएसआर 220 (ई) 26 मार्च 2020 मागे घेण्याबाबत अनेकदा संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकाèयांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून याबाबत शासन व प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेविरुद्ध औषधविक्री बंद करण्याचे आवाहन केले. संघाचे अध्यक्ष इद्रिस डोसाणी, सचिव सावन राठोड व संजय लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो औषधविक्रेते उपस्थित होते. शहर व तालुक्यातील सर्व औषधी दुकाने बंद ठेवली.