जळगाव जामोद,
Memorandum Against Cow Slaughter जळगाव जामोद येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गौरक्षा व गोसंवर्धन संघटनांच्या वतीने गोवंश हत्या थांबवण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. विशेषतः बकरी ईदच्या काळात कुर्बानीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत असल्याचा आरोप करत ही प्रथा पूर्णपणे थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदनात भारतीय शेती, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने गोवंश संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच भारतीय संविधानातील कलम ४८ नुसार राज्यावर गोवंश संरक्षणाची जबाबदारी असल्याचा आणि कलम ५१ अ (ग) नुसार प्रत्येक नागरिकाचे प्राण्यांप्रती करुणा बाळगणे हे कर्तव्य असल्याचा उल्लेख करण्यात आला.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारित १९९५) आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० यांच्या आधारे गोवंश हत्येवर बंदी असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले. तसेच विविध न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देत गोवंश संरक्षण हे सार्वजनिक हिताचे असल्याचे मत मांडण्यात आले.निवेदनात असेही म्हटले आहे की, अशा घटनांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे केवळ कायद्याचा मुद्दा म्हणून नव्हे तर संवेदनशील सामाजिक प्रश्न म्हणून पाहून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी बजरंग दल आणि गौरक्षा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी गोवंश संरक्षणासाठी व्यापक जनजागृती व कठोर अंमलबजावणीची मागणी केली.