वॉशिंग्टन,
Meta Lays Off 8,000 Employees फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीकडून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यामुळे जागतिक स्तरावर टेक क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेटा आपल्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाचा फटका जवळपास 8 हजार कर्मचाऱ्यांना बसू शकतो. कर्मचारी कपातीची सुरुवात सिंगापूरमधील टीमपासून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मेटाकडून पुनर्रचना सुरू
काही कर्मचाऱ्यांना पहाटेच ईमेलद्वारे नोकरी संपुष्टात आल्याची माहिती देण्यात आली. सकाळी उठल्यानंतर इनबॉक्समध्ये आलेला हा मेल पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मेटामध्ये मोठ्या प्रमाणावर 'लेऑफ' होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यानंतर आता कंपनीने प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू केली आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग सध्या कंपनीचा मोठा भर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रावर देत आहेत. ओपनएआय आणि गुगलशी स्पर्धा करण्यासाठी मेटा मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करत असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीच्या अंतर्गत मेमोमध्ये मेटाच्या चीफ पीपल ऑफिसरने सांगितले की, सुमारे 8 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याबरोबरच जवळपास 7 हजार कर्मचाऱ्यांना नव्या एआय संबंधित टीममध्ये हलवण्यात येणार आहे. कंपनी आता कमी पण अधिक प्रभावी टीम्स तयार करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. मेटाने यापूर्वी एआय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. कंपनी यंदा एआय प्रकल्पांसाठी तब्बल 125 अब्ज ते 145 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. सध्या जगभरात मेटामध्ये सुमारे 78 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, टेक क्षेत्रात कर्मचारी कपातीचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. मेटा व्यतिरिक्त, सिस्को, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन यांसारख्या मोठ्या कंपन्यांनीही अलीकडे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात टेक क्षेत्रातील नोकऱ्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.