ऐतिहासिक! सर्वात मोठ्या ‘गरुडा’चे यशस्वी उड्डाण

    दिनांक :20-May-2026
Total Views |
पुणे
Project Garuda भारतीय एरोस्पेस संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रात विद्यार्थी पातळीवर झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नवा इतिहास रचला आहे. विद्यापीठाच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी देशातील आतापर्यंतचे सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या डिझाईन, विकसित आणि उड्डाण करून दाखवले आहे.
 

Project Garuda  
‘टीम स्कायट्रेक’ या विद्यार्थी समूहाने विकसित केलेल्या या महत्त्वाकांक्षी विमान प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ असे नाव देण्यात आले आहे. पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेल्या या प्रकल्पामुळे भारतीय विद्यार्थी संशोधनाची क्षमता आणि तांत्रिक कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
 
 
या विमानाचे सर्वात विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रचंड आकार आणि वजन. ९.२५ मीटर विंगस्पॅन आणि २६१ किलो वजन असलेले हे आरसी इलेक्ट्रिक विमान भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड विमान ठरले आहे. केवळ आकारच नव्हे तर तांत्रिक दृष्टीनेही हे विमान अत्यंत प्रगत मानले जात आहे.या प्रकल्पासाठी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग ॲस्पिरंट्स’ (CRIEYA) मार्फत ४८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. या निधीतून विमानाच्या संशोधन, निर्मिती आणि उड्डाण चाचण्यांसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा विकसित करण्यात आल्या.या संपूर्ण प्रकल्पाला एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, प्र-कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि अन्य वरिष्ठ शैक्षणिक अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, एरोस्पेस विभागप्रमुख डॉ. कमलेश कुलकर्णी, डॉ. सुनील डिंगरे तसेच CRIEYA चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष दराडे यांनीही विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले.
 
 
 
तांत्रिक वैशिष्ट्यांच्या Project Garuda  दृष्टीने हे विमान सुमारे २०० मीटर अंतरावरून टेक-ऑफ करण्यास सक्षम आहे. याची उड्डाण क्षमता सुमारे १० मिनिटे असून ते १०० मीटर उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. १०० किलोग्रॅम पेलोड क्षमता असलेले हे विमान ताशी ८० किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. या विमानामध्ये उच्च क्षमतेची २२० Ah लि-पो बॅटरी वापरण्यात आली असून ती १०० व्होल्ट क्षमतेवर कार्य करते.प्रोजेक्ट गरुडा’च्या यशस्वी उड्डाणामुळे भारतीय विद्यार्थी संशोधन, एरोस्पेस डिझाइन आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला नवे बळ मिळाले असून, भविष्यात अशा उपक्रमांमधून देशातील एरोस्पेस क्षेत्रात मोठी प्रगती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.