रोम,
Modi-Meloni Chemistry in the Spotlight पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत झालेली भेट सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो आणि त्यासोबत लिहिलेल्या संदेशांमुळे या भेटीची विशेष चर्चा रंगली आहे.इटलीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे जॉर्जिया मेलोनी यांनी स्वागत केले. त्यानंतर मेलोनी यांनी मोदींसोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट करत “वेलकम टू रोम, माय फ्रेंड” असे लिहिले. या पोस्टमध्ये त्यांनी भारत आणि इटलीच्या ध्वजांचे इमोजीदेखील वापरले होते. काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भेटीदरम्यानचे काही फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. त्यांनी रोममध्ये आगमनानंतर मेलोनी यांच्यासोबत भोजनावेळी चर्चा झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी ऐतिहासिक ‘कोलोजियम’लाही भेट दिली असल्याची माहिती मोदी यांनी दिली. मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये भारत आणि इटली यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे नमूद केले. पुढील चर्चांची आपण आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही देशांमधील मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या भेटीदरम्यान मोदी आणि मेलोनी यांनी एकाच कारमधून प्रवास केल्याचे फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी जी-20 परिषदेदरम्यान भारत भेटीतही मेलोनी यांनी मोदींसोबतचा सेल्फी शेअर केला होता. त्यावेळीही या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा या भेटीमुळे मोदी आणि मेलोनी यांची केमिस्ट्री चर्चेत आली आहे.