मुंबई,
MPSC Typing Test Discontinued महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. गट-क सेवांतील लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी घेतली जाणारी टंकलेखन कौशल्य चाचणी आता रद्द करण्यात आली आहे. आयोगाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करत नव्या नियमांची माहिती दिली आहे.आयोगाच्या एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बदलाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार असून, त्यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असतानाही आयोगाकडून स्वतंत्र कौशल्य चाचणी घेतली जात होती. त्यामुळे उमेदवारांना एकाच कौशल्यासाठी दोनदा परीक्षा द्यावी लागत होती. या प्रक्रियेमुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास मोठा विलंब होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आयोगाने कौशल्य चाचणी पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे.नव्या पद्धतीनुसार आता उमेदवारांना फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करून ती थेट शासनाकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी शासन स्तरावर केली जाईल. मात्र, उमेदवारांकडे अर्ज भरण्यापूर्वीच शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक राहणार आहे. तसेच जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक आणि तांत्रिक अटी निर्धारित मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक असेल.