कार ३० फूट खोल दरीत कोसळली एक ठार, पाच जखमी

    दिनांक :20-May-2026
Total Views |
रत्नागिरी
Mumbai Goa Highway accident मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळील वालोपे परिसरात बुधवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकून सुमारे २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली 
 

Mumbai Goa Highway accident 
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. मुंबईकडून कोकणच्या दिशेने प्रवास करणारी कार वालोपे परिसरात आल्यानंतर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगामुळे कार रस्त्याबाहेर जाऊन थेट खोल दरीत कोसळली. अपघाताचा जोर इतका भीषण होता की वाहनाचा मोठा चक्काचूर झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि रुग्णवाहिका पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना बाहेर काढून तातडीने चिपळूणमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चालकाचा डुलकी लागणे किंवा नियंत्रण सुटणे याबाबत प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.