21 वर्षांत 25 वी बदली! मुंढे पुन्हा चर्चेत

    दिनांक :20-May-2026
Total Views |
मुंबई,
Mundhe Transferred Again महाराष्ट्रातील कडक, शिस्तप्रिय आणि पारदर्शक प्रशासनासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा बदलीमुळे चर्चेत आले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी करत त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली आहे.अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच मुंढे यांची प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता झालेल्या नव्या बदल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
 
 
tukaram Mundhe
 
तुकाराम मुंढे हे आपल्या कठोर कार्यशैलीसाठी आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी ओळखले जातात. गेल्या 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत ही त्यांची तब्बल 25 वी बदली असल्याचे सांगितले जात आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी अनेकदा भ्रष्टाचारविरोधी आणि पारदर्शक कारभारासाठी ठाम भूमिका घेतली आहे.महापालिका, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच विविध शासकीय विभागांमध्ये काम करताना त्यांनी शिस्त आणि जबाबदारीवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले असून काही वेळा वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत.
 
 
सरकारी नियमानुसार अधिकाऱ्याला एका पदावर साधारणपणे किमान तीन वर्षांचा कार्यकाळ अपेक्षित असतो. मात्र मुंढे यांच्या बाबतीत अल्प कालावधीत वारंवार बदल्या होत असल्याने प्रशासकीय स्थैर्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.आता त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला अन्न व औषध प्रशासन विभाग हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. अन्नाची गुणवत्ता, औषध तपासणी, बनावट औषधांवर कारवाई आणि आरोग्याशी संबंधित नियमांची अंमलबजावणी या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या विभागात येतात. त्यामुळे या नव्या भूमिकेत मुंढे कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या नव्या नियुक्तीनंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या प्रामाणिक आणि कठोर प्रशासनाचे कौतुक केले असून, तर काहींनी वारंवार होणाऱ्या बदल्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एकंदरच, धडाकेबाज आणि वादग्रस्त म्हणून ओळख निर्माण केलेले तुकाराम मुंढे आता अन्न व औषध प्रशासन विभागात आपल्या कार्यशैलीने कोणता ठसा उमटवतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.