मुंबई
Rohit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत हालचाली आणि नेत्यांच्या भेटीगाठींमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या नाराजीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, स्वतः रोहित पवार यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत या सर्व चर्चांना स्पष्टपणे फेटाळले आहे.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांतील हालचाली पुन्हा चर्चेत आल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कांना सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत नाराजी आणि असंतोषाबाबत चर्चांना उधाण आले होते.
या घडामोडींनंतर रोहित पवार नाराज असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली होती. विशेषतः ते आजच्या मुंबईतील बैठकीस अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. ते पुण्यात असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय निरीक्षकांकडून विविध अर्थ काढले जात होते.मात्र या सर्व चर्चांना उत्तर देत रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या अनुपस्थितीमागे कोणतीही नाराजी नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे त्यांना पुण्यात थांबावे लागले. कुकडी आणि बारामती परिसरातील शेतकऱ्यांसाठी जनाई-शिरसाई पाणीप्रश्न महत्त्वाचा असल्याने, तो मार्गी लावण्यासाठी अचानक सिंचन भवनमध्ये उपस्थित राहावे लागल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
प्रशासनाकडून योग्य Rohit Pawar सहकार्य मिळाले असते आणि पाणी सोडण्याबाबत दिलेला शब्द पाळला गेला असता, तर मुंबईतील पूर्वनियोजित बैठकीस उपस्थित राहता आले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीला राजकीय रंग देऊ नये, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला आहे.दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती आणि सामान्य जनतेच्या अडचणी यावर गंभीर लक्ष देण्याची गरज असल्याचेही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केले आहे. पक्ष नेतृत्व यासंदर्भात योग्य भूमिका घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या स्पष्टीकरणानंतर रोहित पवार यांच्या नाराजीबाबत सुरू असलेल्या चर्चांना तूर्तास तरी विराम मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली आणि नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे पक्षातील राजकीय वातावरण पुढील काळातही चर्चेत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.