जिल्ह्यातली २७०० दुकाने होती बंद
अमरावती,
देशभरात Opposition to Online Medicine Sales ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या बेकायदेशीर प्रकारांविरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन केंद्र सरकारच्या २८ ऑगस्ट २०१८ तसेच कोविड काळातील२६ मार्च २०२० या अधिसूचना मागे घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदला अमरावती जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास २ हजार ७०० दुकाने बंद होती. जिल्हा व तालुका स्थानावर संघटनेच्या पदाधिकार्यांनी मागणीचे निवेदन दिले.
अमरावती शहर व १४ तालुके आणि काही मोठ्या गावांमध्ये असे एकूण २७०० दुकाने आहेत. ही सर्व औषधी प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवून राज्यव्यापी आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्यात आला. या एकदिवसीय बंद दरम्यान औषधी विक्रेत्यांनी शासन व प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत हा बंद पाळला. संघटनेच्या मते, इंटरनेट फार्मसी व विविध ई-पोर्टल्सच्या माध्यमातून सुरू असलेली ऑनलाईन औषध विक्री अनेक ठिकाणी नियमबाह्य असून, यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होण्याची शक्यता, बनावट व निकृष्ट औषधांचा धोका तसेच स्थानिक औषध विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
ग्राहकांच्या फसवणुकीचा धोका
Opposition to Online Medicine Sales औषधी विक्रेता संघटनेने स्पष्ट केले की, ऑनलाईन औषध विक्रीसाठी सक्षम नियंत्रण यंत्रणा नसल्याने ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे उपलब्ध होण्याचे प्रकार वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या पृष्ठभूमीवर हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे संघटनेने जिल्हाध्यक्ष सौरभ मालानी यांनी सांगितले. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडल्याचे संघटनेने सांगितले. बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकारी आवश्यक ते सहकार्य करतील, असेही स्पष्ट करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने सुद्धा हेल्पालाईन नंबर दिले होते. तिवसा तालुकाध्यक्ष रणजीत मोझरीकर यांच्यासह अरुण चांडक, गजानन कडू, छगन राऊत, चंद्रशेखर वाट, अतुल देशमुख, जितुभाऊ, मनोज बेलसरे, संजय हांडे, विशाल खोपे, रजत काळे, आदर्श जोशी, शाहरुख शहा, अनुराग भुतडा, कमल किशोर राठी, कृष्णा नायसे आदी पदाधिकारी निवेदन देताना होते.