काय राव ऊन त ऊन वारेही उष्णच!

विदर्भ-मराठवाड्यात ‘ऑरेंज अलर्ट’

    दिनांक :20-May-2026
Total Views |
पुणे,
Orange Alert in Vidarbha and Marathwada महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये हवामानात मोठे आणि अनिश्चित बदल पाहायला मिळत आहेत. राज्यात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून येथे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हिंगोली आणि नांदेडसह मराठवाड्यातील काही भागांनाही उष्णतेचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा अधिक तीव्र जाणवत आहे.
 
 
Orange Alert
 
त्याचवेळी राज्यातील काही भागांमध्ये हवामान वेगळे चित्र दाखवत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सायंकाळनंतर पावसाच्या सरी कोसळू शकतात. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशाच्या इतर भागांमध्येही हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. उत्तर भारतातील बिहार, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे. तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्यटकांनी प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात ढगाळ वातावरण आणि किनारपट्टी भागांमध्ये पूर्वमोसमी वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान अनुभवायला मिळत असून पुढील काही दिवस परिस्थिती बदलती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.