जिल्ह्यात औषधे दुकानदारांचा कडकडीत बंद

    दिनांक :20-May-2026
Total Views |
ऑनलाईन औषधे विक्रीस विरोध
नागपूर, 20 मे
Pharmacists' Complete Strike ऑनलाईन औषधे विक्रीस विरोध व इतर मागण्यांसाठी संपूर्ण जिल्ह्यातील सात हजाराहून अधिक औषधे दुकानदारांनी बुधवारी संपूर्ण दिवस कडकडीत बंद पाळला. गांधीबागेतील घाऊक औषधे बाजारात आज शुकशुकाट होता. एरवी दिवसभर (काही भागात 24 तास) औषधे दुकान सुरू असते. मात्र, ‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’ तसेच ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ या संघटनांनी हा बंद पुकारला होता. नागपूर जिल्ह्यातील औषधे दुकानदारांनी आज सकाळी दुकानेे उघडलीच नाहीत. थेट संविधान चौक गाठले. तेथे जमलेल्या दुकानदारांनी शासनाविरुद्ध निदर्शने केली. काहींच्या हातात मागण्यांचे फलक होते.
 

st ds 
 
नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव उखरे, सचिव संजय खोबरागडे, दिनेश कुकरेजा, मुकुंद दुबे, श्याम चरोडे, पूनित ठक्कर, नंदकिशोर टापरे, मनीष मेहाडिया हरिश गणेशानी, राजेंद्र कावडकर, श्याम परतानी, मोहन अभ्यंकर, सोनाली पडोळे, दीप्ती पडोळे, मृणाली मलगडे आदींसह हजारे औषधे दुकानदार आंदोलनात सहभागी झाले होते.
अध्यक्ष राजीव उखरे, सचिव संजय खोबरागडे यांनी सांगितले की, औषध व्यवसाय हा ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्ट 1940 व नियम 1945 अंतर्गत चालविला जातो. मात्र, ऑनलाईन औषध विक्रीबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद नसतानाही देशभरात सर्रास ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे.
 
 
कोरोना काळात सरकारने होम डिलिव्हरीसाठी दिलेल्या विशेष सवलतीनंतर ऑनलाईन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर औषध विक्री सुरू ठेवली आहे. त्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांपुढे आर्थिक संकट निर्माण होत असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही धोका निर्माण होऊ शकतो. संघटनेने सरकारकडे (डीपीसीओ 2013 अंतर्गत असलेले नफा नियंत्रणाचे नियम पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांच्या पर्यायी ब्रँडची विक्री करण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना देण्याची मागणीही करण्यात आली.
 
 
Pharmacists' Complete Strike  या आंदोलनानंतर संघटेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकाèयांना निवेदन सादर केले. सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. दरम्यान, या बंदमुळे काही रुग्ण व नागरिकांना त्रास झाला. मात्र, आधीच बंदची कल्पना असल्याने नागरिकांनी औषधे आणून ठेवली होती. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या होत्या. जनहित लक्षात घेऊन बंदच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून 60 मोबाईल क्रमांक आंदोलनकर्त्या संघटनेने प्रशासनास दिले होते. नागपूर जिल्ह्यातील मेडप्लस केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट, अपोलो फार्मासी, वेलनेस फॉरएव्हर ही औषधांची साखळी दुकाने नियमितप्रमाणे सुरू होती. जेनेरिक औषधांची दुकाने सुरू होती. आणिबाणीच्या स्थितीत औषधांची अत्यंत गरज भासल्यास चार औषधे निरीक्षकांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले होते.