मुंबई
Prabodh Davkhare, महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी एक महत्त्वाची घडामोड घडली असून भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईत आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रभावशाली डावखरे कुटुंबात राजकीय फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रबोध डावखरे यांचे स्वागत करत त्यांच्या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रबोध डावखरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, दिवंगत वसंतराव डावखरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे. वडिलांनी रुग्णालयात असताना राजकारणात यायचे असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या अंतिम इच्छेचा सन्मान राखत आपण पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रबोध डावखरे यांच्या Prabodh Davkhare, प्रवेशावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी वसंतराव डावखरे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, वसंतराव डावखरे हे राजकारणातील ‘अजातशत्रू’ नेते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे सर्व पक्षांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते. प्रबोध डावखरे हे यशस्वी व्यावसायिक असून त्यांचे मोठे सामाजिक आणि व्यावसायिक नेटवर्क आहे. पक्षात त्यांना योग्य सन्मान आणि जबाबदारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रबोध डावखरे यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, डावखरे कुटुंबाचे ठाणे जिल्ह्यात मोठे राजकीय आणि सामाजिक योगदान आहे. वसंतराव डावखरे यांनी विधान परिषदेचे उपसभापती म्हणून उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात मोठा समर्थक वर्ग निर्माण झाला आहे. प्रबोध डावखरे हे यशस्वी उद्योजक असून राज्यभरात त्यांच्या सुमारे ३० जिम कार्यरत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे जिल्ह्यात नवी ताकद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रबोध डावखरे यांच्या Prabodh Davkhare, या राजकीय निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपमध्ये सक्रिय असलेल्या निरंजन डावखरे आणि राष्ट्रवादीत दाखल झालेले प्रबोध डावखरे यामुळे डावखरे कुटुंबातील राजकीय भूमिका आता स्पष्टपणे दोन वेगवेगळ्या पक्षांत विभागली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.