वर्धेचे प्रशांत पिसे ओमानचे राजदूत!

समाजाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

    दिनांक :20-May-2026
Total Views |
वर्धा, 
Prashant Pise Ambassador to Oman वर्धा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद बातमी समोर आली आहे. वर्धेचे सुपूत्र व भारतीय परराष्ट्र सेवेचे १९९५ बॅचचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत पिसे यांची ओमान सल्तनतचे पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सध्या ते परराष्ट्र मंत्रालयात अतिरित सचिव (इमिग्रेशन पॉलिसी अ‍ॅण्ड वेलफेअर) या पदावर कार्यरत असून, लवकरच ते मस्कत येथे आपला पदभार स्वीकारतील. त्यांनी गोदावर्ती व्यंकट श्रीनिवास यांची जागा घेतली आहे. प्रशांत पिसे यांच्या नियुतीमुळे वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाने प्रत्येक वर्धेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रशांत पिसे यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक मुत्सद्देगिरीत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.
 
 
 
pise
 
 
 
प्रशांत पिसे यांची राजनैतिक कारकीर्द अत्यंत देदिप्यमान राहिली आहे. त्यांनी यापूर्वी ट्युनिशियाचे राजदूत म्हणून जानेवारी २०१६ ते जून २०१९ पर्यंत काम पाहिले आहे. तसेच मॉरिशसमध्ये उप-उच्चायुत, लंडन येथे मिनिस्टर (माहिती व माध्यम), टोकियो येथे काउन्सिलर म्हणून महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. कैरो व त्रिपोली येथेही त्यांनी सेवा बजावली आहे. दिल्लीत परतल्यानंतर त्यांनी आयसीसीआरचे उप-महासंचालक म्हणूनही काम पाहिले. वर्धेच्या या सुपुत्राच्या पुढील वाटचालीसाठी सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
 
 
भारत-ओमान संबंध अधिक दृढ होणार
ओमान हा भारताचा आखाती प्रदेशातील सर्वात महत्त्वाचा व विश्वासू भागीदार देश आहे. तेथे ८ लाखांहून अधिक भारतीय वास्तव्यास आहेत. ऊर्जा, व्यापार, सागरी सुरक्षा व डायस्पोरा कल्याण या क्षेत्रात दोन्ही देशांचे घनिष्ठ संबंध आहेत. प्रशांत पिसे यांच्या अनुभवाचा फायदा या संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी निश्चितच होईल.