तभा वृत्तसेवा
मारेगाव,
sachin-devalkar : मारेगाव येथे आपल्या आईची भेट घेऊन आपल्या कारने चंद्रपूरला परत जात असताना मारेगावच्या पुत्राचा गौराळा ते निंबाळा दरम्यान अपघात झाला. या अपघातात सचिन जगन देवाळकर (वय 37) यांचा जागीच मृत्यू झाला. सचिन देवाळकर हा मारेगाव येथील मूळ गावचा होता. तो सध्या चंद्रपूर येथे कामानिमित्त राहत होता. चंद्रपूर येथे कंपनी व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. मंगळवार, 19 मे रोजी यवतमाळ येथे काम आटोपून परतत असताना मारेगाव येथे आईची भेट घेतली आणि चंद्रपूरला रवाना झाला.
परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एका ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून येणाèया पिकअप वाहनाची आणि सचिन देवाळकर यांच्या अल्टो कारची धडक झाली. ही धडक एवढी जबर होती की यात सचिनचा जागीच मृत्यू झाला. सचिनच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सचिनच्या एकाएकी जाण्याने त्याचे कुटुंब पोरके झाले आहे.
मारेगाव येथील यशस्वी व्यवसायक
सुरवातीला मारेगाव तहसील कार्यालयात सचिन देवाळकर संगणकचालक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने स्वतःचा कॅफे आणि पत्नीसाठी कापड दुकान सुरू केले होते. त्यानंतर एका बँकेमध्ये काही दिवस व्यवस्थापक म्हणूनही काम केले. त्यानंतर चंद्रपूर येथे एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून तो कार्यरत होता.