मनमोहक आंबा ठरला जीवघेणा सात जणांना विषबाधा

    दिनांक :20-May-2026
Total Views |
अहिल्यानगर,
mango poisoning case अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील आरे वस्ती परिसरात आमरस खाल्यानंतर एका कुटुंबातील सात जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्व बाधितांवर अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलेली आहे शेवगाव येथील आरे वस्ती परिसरात वास्तव्यास असलेल्या जायभाय कुटुंबाने काही दिवसांपूर्वी बाजारातून आंबे खरेदी केले होते. शनिवारी सायंकाळी या आंब्यांचा आमरस तयार करून कुटुंबातील सदस्यांनी त्याचे सेवन केले. त्यानंतर काही वेळातच चक्कर येणे, तोल जाणे आणि बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसू लागली.
 

mango poisoning case  
या प्रकारानंतर भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय, रेणुका जायभाय, सागर जायभाय, अभिजित जायभाय, पूनम जायभाय, शीतल जायभाय आणि चार वर्षीय अवनी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांच्यावर बारकाईने निरीक्षण ठेवण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय, आमरसातून विषबाधा कशी झाली, याचा तपास आरोग्य यंत्रणांकडून सुरू आहे. उन्हाळ्यात आंब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने अन्नसुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.