बकरी ईद दरम्यान होणारी गोवंश हत्या थांबवा

*जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन

    दिनांक :20-May-2026
Total Views |
बुलढाणा, 
stop-cow-slaughter : जिल्ह्यात नियमितपणे होत असलेली अवैध गोवंश हत्या तसेच बकरी ईद दरम्यान जाणून बुजून केली जाणारी गोवंशाची कुर्बानी तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दि. २० मे रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे.
 
 
KL
 
 
 
या निवेदनात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेट ऑफ गुजरात विरुद्ध मिर्झापूर मोती कुरेशी कसाब या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ देत गोवंश संरक्षणासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय संस्कृती, शेती, पर्यावरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोवंशाचे संरक्षण करणे हे केवळ धार्मिक नव्हे तर संवैधानिक कर्तव्य आहे. भारतीय संविधानाच्या कलम ४८ नुसार राज्यावर गोसंरक्षणाची जबाबदारी असून कलम ५१अ(ग) नुसार प्रत्येक नागरिकाने सर्व सजीव प्राण्यांविषयी करुणा बाळगणे आवश्यक आहे.तसेच महाराष्ट्रात लागू असलेल्या कायद्यांनुसार गोवंश हत्या हा दंडनीय गुन्हा असूनही काही ठिकाणी अवैधरित्या गोवंश वाहतूक, कत्तल व कुर्बानी सुरू असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा घटनांमुळे समाजातील धार्मिक भावना दुखावल्या जात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शयता वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
गोवंश संरक्षण ही भारतीय परंपरा, संत परंपरा व राष्ट्रपुरुषांनी दिलेली शिकवण असल्याचे नमूद करत भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या विचारांचाही उल्लेख करण्यात आला आहे. प्रशासनाने या विषयाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहून जिल्ह्यातील अवैध गोवंश हत्या तात्काळ बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच बकरी ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक,अध्यक्ष गौसेवा आयोग महाराष्ट्र राज्य यांनाही देण्यात आल्या संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार बुलढाणा यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले .निवेदन देते वेळी विश्व हिंदु परिषद जिल्हा अध्यक्ष जयंत जोशी,जिल्हा मंत्री माधव धुंदाळे,सहमंत्री ज्ञानेश्वर माळोदे,जिल्हा संयोजक अरुण देशमुख,बुलढाणा शहर मंत्री मनोज बैरागी,शहर संयोजक राहुल बेंडवाल,सह संयोजक प्रतिक कदम,ग्रामीण प्रखंड संयोजक अभिलाष चौबे,गौरक्षक मिलिंद चिंचोळकर,अजित गुळवे,धाड प्रखंड मंत्री मयुर खडके या वेळी उपस्थित होते.