उत्तर प्रदेशात भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू!

    दिनांक :20-May-2026
Total Views |
मुरादाबाद,
Suspicious Death of BJP Leader उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाशी संबंधित शेतकरी नेते चंद्रपाल सिंह (वय 55) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दांडा गोविंदपूर गावाजवळील शेतात त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपाल सिंह मंगळवारी रात्री घरासमोर व्हरांड्यात झोपले होते. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. सकाळी गावकरी शेतात गेले असता झाडाला लटकलेला मृतदेह दिसून आला.
 
 
 
Suspicious Death of BJP Leader
 
प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी कुटुंबीयांनी हा खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे.कुटुंबीयांचा दावा आहे की, चंद्रपाल सिंह यांची हत्या करून नंतर आत्महत्येचा बनाव करण्यात आला. घटनास्थळी मोबाइल, काठी आणि कपडे विखुरलेल्या अवस्थेत आढळल्याने झटापट झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांना रात्री फोन करून बाहेर बोलावण्यात आल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे.